यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना करता येणार होडीतून जलप्रवास
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या काटेकोर नियोजनामुळे भीमा नदीत येणारा विसर्ग बंद
B1न्यूज मराठी नेटवर्क
चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंट राहणार वारकरी व भाविकांसाठी उपलब्ध
पंढरपूर : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग शून्य करण्यात यावा आशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांना दिल्या होत्या. त्यानुसार जलसंपदा विभागाने तात्काळ कार्यवाही करून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा विसर्ग शून्य केला आहे. मागील पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर येथे भीमा नदी पात्रातील विसर्ग स्थिर करून वाळवंट रिकामे व्हावे यासाठी प्रयत्नशील होते, त्यांनी केलेल्या सक्षम व काटेकोर नियोजनामुळेच हे शक्य झालं.
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा विसर्ग शून्य झाल्याने आज रात्री एक ते दोन च्या दरम्यान चंद्रभागा नदीपात्राची पाणी पातळी योग्य प्रमाणात राहणार आहे. चंद्रभागा नदीपात्राची पाणी पातळी कमी झाल्याबरोबर वाळवंट रिकामे होईल. त्यानंतर दिनांक 4 जुलै रोजी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून वाळवंट स्वच्छ करण्यात येणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना रिकामे व स्वच्छ वाळवंट उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भाविकांना वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त वाळवंटात त्यांचे नियमित कार्यक्रम करणे शक्य होणार आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने नदी पात्रात आज सकाळी सात हजार पाचशे इतका विसर्ग सोडण्यात आला आहे तो विसर्ग चंद्रभागा नदी पात्रात पाच जुलै रोजी पहाटे पाच वाजता पोहोचणार आहे. उजनीचा विसर्ग पूर्णपणे बंद असल्याने चंद्रभागा पात्रातून 7200 इतकाच प्रवाह राहील. त्यामुळे वारकरी, भाविकांना रिकामे व स्वच्छ वाळवंट वापरण्यास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी व भावीक वाळवंटाचा वापर करू शकतात. त्यामुळे पंढरपूर शहरात इतर ठिकाणी भाविक, वारकऱ्यांचा अधिकचा ताण व गर्दी राहणार नाही. पाण्याचा प्रवाह पातळी कमी असल्याने पुंडलिक मंदिर पाण्याखाली जाणार नाही. व वारकरी, भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात होडीतून जल प्रवास सेवाही उपलब्ध होऊ शकणार आहे. 
दिनांक 3 जुलै रोजी रात्री एक पासून ते पाच जुलै 2025 च्या पहाटे पाच पर्यंत भीमा नदी पात्रात येणारा विसर्ग हा 5 हजार क्युसेक असेल तर 5 जुलै च्या पहाटे सहा वाजल्यापासून पूर्ण यात्रा कालावधीत भीमा नदी पात्रात 7 हजार 200 क्युसेक पाण्याचा प्रवाह राहील. त्यामुळे संपूर्ण यात्रा कालावधीत दगडी फुल व पुंडलिक मंदिर तसेच वाळवंट रिकामे होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मागील पंधरा दिवसापासून उजनी धरणातील पाण्याविषयी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे उजनी धरणात ही बफर स्टॉक निर्माण झालेला आहे. तसेच भीमा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग कमी करणे शक्य झालेले आहे.




