अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अंगणवाडी सेविकेला जातिवाचक शिवीगाळ करून वाईट उद्देशाने हात धरून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहिता 74,75,79,351(2), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3(1)(r),3(1)(s),3(1)(w)(i),3(1)(w),(ii),3(2)(va), या कलमान्वये गुन्हा दाखल असून आरोपीस पोलिसांनी अटक केली.
सचिन मनोहर थोरात असे त्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अंगणवाडी सेविका मुलांना शिकवत असताना आरोपी हा त्याच्या मुलास घेऊन अंगणवाडीत आला. खुर्चीवर येऊन बसून मुलांना तुम्ही या बाईचे काही ऐकू नका. मी तुम्हाला मोबाइलमध्ये लहान मुलांची गाणी लावून देतो, असे म्हणून सेविकेकडे वाईट नजरेने बघत होता. तसेच इशारे करीत, हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. तसेच तुझी लायकी नाही, तू कामावरून स्वतःहून राजीनामा दे, नाही तर मी तुला असाच त्रास देणार, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी सचिन मनोहर थोरात याने विधीज्ञांमार्फत बार्शी येथील मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील जामिन अर्जाचे सुनावनी दरम्यान पीडित महिलेने तिचे विधीज्ञांमार्फत लेखी म्हणणे व महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयात दाखल करून आरोपीचे जामीन अर्जास हरकत घेतली. फिर्यादीचे विधीज्ञ व सरकारी विधीज्ञ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विक्रमादित्य मांडे यांनी आरोपी सचिन मनोहर थोरात याचा जामीन अर्ज नामंजूर केला. याकामी फिर्यादी पिडीत महिलेच्या वतीने ॲड. सुहास कांबळे व ॲड. आकाश तावडे यांनी काम पाहिले तसेच सरकारी विधीज्ञ ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.