बार्शीमहाराष्ट्र

बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांची झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी असलेले आणि सध्या झारखंड मध्ये कार्यरत असणारे आयएएस अधिकारी रमेश घोलप यांची नुकतीच झारखंड राज्यातील चतरा या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे.या नियुक्तीबाबत त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव आणि अभिनंदन होत आहे.

रमेश घोलप यांनी यापूर्वी झारखंड राज्यामध्ये सरायकेला, कोडरमा आणि गढवा या तीन जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी कार्य केलेले आहे. त्यांनी कोडरमा या ठिकाणी कोविडच्या काळात केलेल्या कार्याबद्दल आणि बालमजुरी विरोधात तसेच बालकामगारांना बालमजुरीतून मुक्त करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल नोबेल पारितोषिक विजेते मा. कैलास सत्यार्थी यांनी देखील त्यांचे कौतुक केलेले आहे. गढवा जिल्ह्यामध्ये बुढा पहाड या अति नक्षलग्रस्त भागात जाणारे ते स्वातंत्र्यानंतरचे पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन नक्षलग्रस्त भागातील लोकांना शासनाच्या योजनांशी जोडण्याबाबत केलेल्या कार्याचे झारखंड राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री हेमंत सोरेन आणि राज्याचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी कौतुक केले होते. गढवा जिल्ह्यामध्ये त्यांनी पिढ्यानपिढ्या विकासापासून दूर असलेल्या अती मागास मुसहर लोकांना शिक्षणाच्या आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचे सगळीकडे कौतुक झाले होते. यापूर्वी त्यांनी कोविडच्या काळामध्येही झारखंड राज्याच्या स्वास्थ्य विभागाची जबाबदारी मिशन डायरेक्टर राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन या पदावर कार्य करत असताना संभाळलेली आहे.

यापूर्वी त्यांनी झारखंड राज्याच्या कृषी संचालक, उद्योग विभागाचे संचालक यासह धनबाद महानगरपालिका आयुक्त म्हणूनही कार्य पाहिलेले आहे. सध्या ते झारखंड राज्याच्या वित्त विभागामध्ये सहसचिव आणि वित्त संचालनालयाचे प्रमुख म्हणून कार्य पाहत आहेत.

नव्या नियुक्तीनंतर त्यांना आगामी लोकसभा निवडणुका चतरा सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये शांतीपूर्ण पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान असणार आहे. समाजाभिमुख अधिकारी आणि माफियाविरोधात तितक्यात सख्त पद्धतीने कारवाई करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोळसा, वाळू माफिया, रेशन काळाबाजारी, अवैध हॉस्पिटल्स यांच्या विरोधात त्यांनी आजपर्यंतच्या पोस्टिंगमधे धडक कारवाया केलेल्या आहेत. सर्वसामान्यांमधे मिसळून, ग्रामीण भागात जनता दरबार आयोजित करून त्यांच्यासाठी संवेदनशील पणे केलेल्या कार्यांचे कित्येकदा वेगवेगळ्या पातळीवर कौतुक झाले आहे. गरिबांचा साहेब, पेन्शनवाला साहेब अशीही त्यांची ओळख आहे.संपूर्ण देशभरातून जिल्हाधिकारी रमेश घोलप यांच्या नवीन जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button