किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल , खंडपीठाने पोलिसांना दिले आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहमदनगर : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केलं होतं.
त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर (Indurikar Maharaj) महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी अहमदनगर (Ahmadnagar News) येथील आपल्या कीर्तनातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी केलं होतं. त्यांच्या कीर्तनाच दरम्यान, अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
इंदुरीकरांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते.’आमचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा’ अशी मोहीमच सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर समर्थकांनी इंदुरीकर महाराजांसाठी आंदोलन, मोर्चे काढण्याची तयारी सुद्धा दाखवली होती.
मात्र, इंदुरीकरांनी त्यांना आंदोलनं आणि मोर्चे काढण्यापासून रोखलं. पुढे अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने (Ahmadnagar Court) त्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.