पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गीतरामायणामुळे समाजाला रामायण सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे. माडगुळकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार आवश्यकता असल्यास स्मारकासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येईल. अनेक साहित्यप्रेमी श्रद्धेने हे स्मारक पूर्ण झाल्यावर भेट देतील. महापालिकेने स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

आमदार तापकीर म्हणाले, गदिमांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाचे स्मरण होणे आणि पुढील पिढीला यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे काम सुरू होत असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

सुमित्र माडगूळकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात ढाकणे म्हणाले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ग.दि. माडगूळकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. गदिमांच्या स्मारकाच्या माध्यमातून मराठी भाषेतील त्यांचे लेखनकार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. स्मारकात गीतरामायण दालन, वैयक्तिक दालन, चित्रपट दालन, साहित्य दालन, डिजिटल दालन, कॅफेटेरिया आदी विविध कामांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या