वीज पडून एकाचा मृत्यू अवकाळी पावसाने 341 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील कोंढाळा (झामरे) येथील ज्ञानेश्वर इंगोले (वय 28) या युवकाचा आज 27 एप्रिल रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला.जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 341.84 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले असून या तालुक्यात 270 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 12.9 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मानोरा तालुक्यात वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला. कारंजा आणि मानोरा तालुक्यात अनुक्रमे 12 आणि 10 अशी एकूण 22 घरांची पडझड झाली.
अवकाळी पाऊस व गारपिटीने रिसोड तालुक्यात 19 हेक्टरवरील कांदा पिकाचे, मालेगाव तालुक्यात 2 हेक्टरवरील आंबा आणि कांदा बी चे, मंगरूळपीर तालुक्यात 20 हेक्टरवरील भाजीपाला, लिंबू व कांदा बी,कारंजा तालुक्यात 30.80 हेक्टरवरील पपई, कांदा,ज्वारी, संत्रा, मूग, भाजीपाला,बरबटी, पेरू, गहू व तीळ पिकाचे आणि मानोरा तालुक्यात 270 हेक्टरमधील शेत पीक व फळ पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.