पालकमंत्र्यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन व मंदिर परिसराची केली पाहणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

भाविकांसाठी स्वच्छतागृहासह विविध सुविधा देण्यावर भर : पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पालकमंत्री केसरकर यांनी आज श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या विकास कामांसाठी आवश्यक जागांची पाहणी केली. पागा इमारत येथे भाविकांसाठी उभारण्यात येत असलेल्या स्नानगृह, स्वच्छतागृह कामाची पाहणी करुन सद्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी तथा देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री अंबाबाई मंदिर जतन व संवर्धन तसेच परिसरातील विकास कामांबाबत त्यांनी चर्चा केली. गरुड मंडपाचे सर्व्हेक्षण, नगारखाना व मणिकर्णिका कुंडाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करणे, दर्शन रांग, स्वच्छतागृहांची उभारणी व नूतनीकरण, भक्तनिवास उभारणी आदी सर्व सुविधा मंदिर परिसरातच उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. भाविकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देऊन मंदिर परिसराचा विकास करण्यावर भर द्या, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. पुरातत्व विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यावर तज्ज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त करुन श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाबाबत निर्णय घेतला जाईल. श्री अंबाबाई शक्तिपीठाचे महत्व जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता संजय पाटील उपअभियंता महेश कांजर, देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, स्थापत्य अभियंता सुयश पाटील तसेच पुरातत्व जतन व संवर्धन क्षेत्रातील स्थापत्य अभियंता गौरव ठाकरे यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री श्री केसरकर यांनी चर्चा करुन सूचना केल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या