धाराशिवधार्मिकमहाराष्ट्र

येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा सहा एप्रिल पासून सुरवात

B1न्यूज मराठी नेटवर्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेला , चैत्र पौर्णिमेला प्रारंभ

येरमाळा : तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा (ता. कळंब) येथील येडाई तथा येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा महायात्रेस गुरुवार सहा एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. सहा ते बारा एप्रिल दरम्यान येथे विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येडाई तथा येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मुक्तरंग म्युझिकने नवीन भक्तीगीत रिलीज केले आहे. चला येडाईच्या जत्रेला असे या गाण्याचे बोल असून, गीतकार सुनील ढेपे यांनी लिहलेल्या या गीताला बापू पवार यांनी संगीत दिले आहे तर गजराबाई भुंबे आणि बापू पवार यांनी आपल्या दमदार आवाजात हे गीत गायिले आहे. गीतकर सुनील ढेपे यांनी येडाई देवीवर यापूर्वी लिहिलेली येडामाय खेळतीया फुगडी, येडाईच्या भक्तीचा वारा सुटला ही दोन गाणी लोकप्रिय झाली आहेत. चला येडाईच्या जत्रेला हे तिसरे भक्तीगीत नुकतेच रिलीज झाले असून, त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते, शंकराला पार्वतीने सांगितले, दंडक अरण्यात प्रभू श्रीराम फिरत आहेत. त्यास मी एकदा तरी फसवेन म्हणून दंडक अरण्यात रात्र फिरताना पार्वतीने सीतेचे रूप घेवून रामास फसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रभु श्रीरामांनी ‘तू वेडी आहेस’ असे पार्वतीस म्हटले. तेव्हापासून या देवीस ‘येडाई’ हे नाव पडले व या डोंगरास येडेश्वरीचा डोंगर म्हणून ओळखले जाऊ लागले. या आधी तुळजापूर येथे राम वनवासात फिरत असताना रामाने तुकाई म्हटले. याचा अर्थ तु का येथे? असा होय. त्यानंतर तू जा ये, असे म्हटल्याने तुळजापूर हे नाव पडले. कोरेगाव येथे यमाई हिचेच रूप असून तू माझ्या मागे यमासारखे का लागलीस, असे म्हटल्याने यमाई हे नाव कोरेगाव येथील देवीस पडले. यानंतर माहुरगडची रेणुका देवी हिचेच रूप असून अनेक ठिकाणी वेगवेगळया नावाने ओळखली जाणारी ही पार्वती येरमाळ्यात येडाई या नावाने ओळखली जाते. नवसाला पावणारी येडाई अशी मनात भक्ती ठेऊन भक्तगण लाखोंच्या संख्येने चैत्र पौणिर्मेस येरमाळा येथे येतात. पौणिर्मेच्या आदल्या दिवशी सायंकाळी कार्यक्रम, सकाळी तेल चढविणे आदी कार्यक्रम केले जातात. नंतर देवीची पालखी डोंगरावरून खाली गावातून आमराईत येत असताना चुनारूपी अक्षता सर्वभक्त मिळून पालखीवर चुनखडी रानातून टाकतात. यावेळी लाखो भक्त पालखीचे दर्शन घेतात. याच वेळी आमराईतील आंब्याच्या झाडाला कवड्यासारखे फोड आल्यासारखे दिसतात. या कवड्या पाहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. येरमाळा या नावावरूनही एक आख्यायिका आहे. सीता ही वेड्यासारखी माळावरून फिरत असल्यानेच हे नाव पडले, असे सांगितले जाते. श्री येडेश्वरी देवीकडे श्रद्धा ठेवून मागणी केल्यास मनातील काम पूर्ण होते. हे नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गदीर्वरून स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेला येत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button