सर्वसामान्यांच्या हितास्तव आपल्या अनुदानित शाळा टिकल्या पाहिजेत, ही आपणा सर्वांची जबाबदारी : डॉ कोकाटे
B1न्यूज मराठी नेटवर्क
डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे “जीवन गौरव” पुरस्काराच वितरण
बार्शी : कर्मवीर जगदाळे मामांसह राज्यातील थोर शिक्षण महर्षींनी सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील मुलं-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शाळा महाविद्यालयांची उभारणी केली. आता परदेशातील स्कुल, विद्यापीठे आपल्याकडे येत आहेत. अशा काळात येथील जि प, नगरपालिका व संस्थेच्या अनुदानित शाळा टिकल्या पाहिजेत. अन्यथा सर्वसामान्यांना शिक्षण घेणे मुश्किल होईल. या शाळा टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे असे प्रतिपादन वक्ते व इतिहास अभासक डॉ श्रीमंत कोकाटे यांनी केले. येथील डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण ग्रंथालय हॉल येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजा माने होते. यावेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ सुग्रीव गोरे, प्राचार्य डॉ दीपक गुंड, डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश राऊत यांच्यासह, प्रा तानाजी ठोंबरे, प्राचार्य चंद्रकांत मोरे आदी उपस्थित होते.डॉ. कोकाटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरचे व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील अनेक तत्ववेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबद्दल गौरवोद्गार काढून त्यांची महानता स्पष्ट केली आहे. म्हणून त्यांचा इतिहास अनेक भाषांत आला पाहिजे असे मत व्यक्त केले. वायुपुत्र नारायणराव जगदाळे व डॉ कुन्ताताई जगदाळे हे उदात्त, प्रगल्भ विचाराचे व मानवतावादी दृष्टिकोन असलेले दाम्पत्य होते. विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींची निवड सार्थ असून त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा पुरस्कारार्थींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्काराच्या निमित्ताने या संस्थेचे पदाधिकारी कर्मवीर मामा, वायुपुत्र बाबा व माई यांच्या स्मृती जपत आहेत. जेष्ठ पत्रकार राजा माने म्हणाले, छत्रपती शिवरायांचे जे पैलू महाराष्ट्रापुढे दिसले नव्हते ते पुढे आणण्याचे कार्य डॉ कोकाटे करत आहेत. मामांनी जो संस्कार इथल्या मातीत रुजविला आहे, त्याची फळे म्हणून येथील व्यक्तींकडून चांगल्या कृती राज्यभर होत असतात.यावेळी पुरस्काराला उत्तर देताना तुळशीदास गव्हाणे यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे सांगून सर्व पुरस्कारार्थींच्यावतीने आभार मानले. प्रा सुनील विभुते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश राऊत यांनी प्रास्ताविकात संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले. पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असल्याचे ते म्हणाले. प्रा. माधुरी शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. निता देव यांनी सूत्रसंचालन केले. सतीश राऊत यांनी आभार मानले. बहु. संस्थेचे मार्गदर्शक प्रा. हेमंतकुमार शिंदे, बाळासाहेब गुंड, प्रा. प्रकाश पालके संस्थेचे संचालक प्रा. सुनील शेळके, प्रा. श्रीपाद भंडारी, ऍड काकासाहेब गुंड, प्रकाश इंगोले, कल्याण तांबे, निलेश मोहिते, बलभिम माळी तसेच अशोक डहाळे आदी यावेळी उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
शंकर उर्फ बापूसाहेब कोकाटे (सामाजिक), तुळशीदास गव्हाणे (कृषी), प्रा.डॉ. सुनील विभुते (साहित्य), प्रशांत पैकेकर (बांधकाम उद्योजक ), डॉ. किशोर गोडगे ( वैद्यकीय ), चंद्रकांत करडे (पत्रकारिता), विजय भानवसे (शैक्षणिक), मोहम्मद बागवान (कला), प्रा. डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के (क्रीडा ) यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.