बार्शी शहर पोलिसांनी बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेट उघड केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून बार्शी पोलीसांना गौरवपत्र बहाल

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने नियोजनबद्ध तपास, तांत्रिक विश्लेषण व समन्वित कारवाईद्वारे बार्शी–परंडा परिसरात कार्यरत असलेले अमली पदार्थ विक्री रॅकेट उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून बार्शी शहर पोलीस ठाण्यास गौरवपत्र बहाल करण्यात आले आहे.
दि. १७ एप्रिल २०२५ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करून परांडा रोड पेट्रोलपंपाजवळ सापळा रचण्यात आला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून मॅफेड्रॉन (एम.डी.) प्रकारचा २०.०४ ग्रॅम अंमली पदार्थ, १ गावठी पिस्टल, ३ जिवंत राऊंड, मोबाईल हँडसेट्स, वजन काटा, रोख रक्कम आणि टोयोटा कार असा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
पुढील तपासादरम्यान अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे एकूण १३ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरील सर्व आरोपीकडून सुमारे १८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर घटनेत पुरावे संकलन, पंचनामा, फॉरेन्सिक साक्ष्य, आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण व सुसंगत तपास प्रक्रियेच्या आधारे आरोपींविरुद्ध NDPS Act कलम 8(क), 22(b), 29, भा.दं.वि. कलम 120(B) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
या उत्कृष्ट व नियोजित तपास कार्यवाहीची दखल घेऊन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून बार्शी शहर पोलीस ठाण्यास ‘प्रशस्ती पत्रक’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी अभियानास बळकटी देणारी असून पोलीस दलातील दक्षता, तांत्रिक कौशल्य व संघटित कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.