महिलांचे कायदेशीर अधिकार विषयावर कार्यक्रमाचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण आणि महिलांचे कायदेशीर अधिकार’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण पुणे श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा न्यायालयातील न्या. सी. पी. शेळके, न्या. सुधीर वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नामदेव शिरगावकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शरद कुंटे आणि अशोक पलांडे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया चोपडे आदी उपस्थित होते. न्या. कश्यप यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिला, बालके, वंचित घटकातील नागरिक आदीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आणि महिलांच्या सक्षमीकरणात आयोगाचे असलेले योगदान याबाबत माहिती दिली.यावेळी न्या. शेळके, न्या. वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, नारी समता मंच संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त प्रीती करमरकर, आय.एम.ए. च्या माजी अध्यक्ष डॉ. वैजयंती पटवर्धन आदींनी आपले विचार मांडले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील हिंसेविरूध्द संदेश देणारे पथनाट्य सादर केले.