महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी १० दिवसाच्या मुदतीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने व्यक्तीसाठी १ व सामाजिक संस्थांसाठी १ असे एकूण २ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांचे वितरण २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशी होणार आहे.व्यक्तीगत पुरस्कारासाठी:
अर्जदार हे वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवक असावेत. वयोमर्यादेची अट पुरुषांसाठी ५० वर्षे व महिलांसाठी ४० वर्षे अशी आहे. पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, दहावी बोर्ड प्रमाणपत्र व जातीचा दाखला आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.संस्थेसाठी पुरस्कार:
अर्जदार संस्था ही वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी तसेच कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी असावी. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अभिलेखे, पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे.अर्जदारांनी आपले अर्ज सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे ४११००६ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे उद्यापासून १० दिवसाच्या मुदतीत सायं ५.३० वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.