बार्शीतील ऐतिहासिक शिवजयंती आणि पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण…

B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दुपारी तीन वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळ्याला सुरुवात होईल.
बार्शी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बार्शीतील शिवजयंती महोत्सवतील पारंपरिक, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक पालखी सोहळ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. बार्शीतील शिवजयंतीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या नऊ वर्षापासून बार्शीतील पालखी सोहळा हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळा बनला असून हजारोंच्या संख्येने शिवभक्त या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. यामध्ये विशेष करून महिला, युवती व बालकांचा खूप मोठा सहभाग असतो. या पालखी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या पालखी सोहळ्याचे कुणीही प्रमुख, अध्यक्ष, पदाधिकारी, किंवा आयोजक नसून, सर्व शिवभक्त मिळून हा पालखी सोहळा मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात शांततेमध्ये पार पाडतात. बार्शीचा शिवजन्मोत्सव आणि पालखी सोहळा हा उत्सव म्हणून प्रत्येक बार्शीकर साजरा करतात. बार्शी शहरातील प्रमुख चौकात पारंपरिक पद्धतीने दवंडी देऊन पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बार्शीकरांना आमंत्रण देण्यात आले आहे…..
चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा…पालखी मार्ग खालील प्रमाणे :
पालखी सोहळा मार्ग हा उपळाई रोड ते कॉलेज व छत्रपती चा पूर्णाकृती स्मारक येथून कोर्ट, हांडे गल्ली, एकविरा आई मंदिर, जुनी वेस छत्रपती संभाजी राजे चौक, भगवंत मंदिर, महाद्वार चौक, रामभाऊ आबा पवार चौक, पटेल चौक, पानखुट ऐनपुर मारुती रोड, दुधवाले चौक, तेल गिरणी चौक , छ शिवाजी आखाडा, नवीन पोलीस स्टेशन समोरुन, एसटी स्टँड चौक, पोस्ट चौक, जुने पोलीस स्टेशन, सोमवार पेठ तेथून सरळ पांडे चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जवाहर हॉस्पिटल या ठिकाणी सांगता होईल.