राहुरीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वांबोरी चारीसाठी ५७ कोटींचा निधी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
पाणीटंचाई, मतदार पुनरिक्षण आणि खत उपलब्धतेबाबत आढावा बैठक
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : राहुरी शहर व तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत वांबोरी चारी टप्पा-१ साठी १७ कोटी रुपये आणि टप्पा-२ साठी ४० कोटी रुपये, असा एकूण ५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम आणि तालुक्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अक्षय कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, अनुप यादव, प्रसाद मते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेत प्रक्रिया पारदर्शक, अचूक व विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमवेत समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.
बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, सुरू असलेले टँकर आणि नागरिकांसमोरील अडचणींचा आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टंचाई निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या युरिया खताच्या टंचाईची दखल घेत संबंधित विभागांनी खताचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच वांबोरी चारीच्या दोन्ही टप्प्यांतील कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहे. शासनाच्या विविध जनहिताच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमवेत समन्वयाने व संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहनही डॉ. विखे पाटील यांनी केले.





