बार्शी तालुका पोलिसांची पुन्हा धडाकेबाज कारवाई; कथित गोमांस वाहतूक प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा, ₹१.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. २६ : बार्शी तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेल्या कथित गोमांसाची वाहतूक व विक्रीसाठी नेले जात असल्याच्या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सुमारे ₹१ लाख ५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे नागोबाचीवाडी (ता. बार्शी) येथे काही व्यक्ती मोटारसायकलवरून कथित गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांकडून मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना करून नाकाबंदी केली. कारवाईदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील पोत्यामध्ये कथित गोमांस आढळून आले.
यानंतर घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – १) नजीर अहमद दस्तगीर कुरेशी
२) महमदनूर फतेह अहमद कुरेशी
३) रियाज कुरेशी
४) इब्राहिम खाजा कुरेशी
५) बाबुल सौदागर
६) एक १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी
पोलिसांनी या कारवाईत सुमारे ₹१.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. यापुढेही शासनाने प्रतिबंधित केलेल्या बाबींविरोधात बार्शी तालुका पोलीस कठोर कारवाई करणार असून, अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर तसेच राजेंद्र मंगरुळे, पांडुरंग देशमुख, सोमनाथ खांडेकर, युवराज गायकवाड आणि लक्ष्मण चिट्ठलवाड यांनी सहभाग घेतला.





