रुक्मिणीमातेच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय आगमन; पावसाच्या सरींनी वारकरी आणि बळीराजा सुखावला
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर (रुक्मिणीमातेचे माहेर) येथून निघालेल्या जगद्गुरू आदिशक्ती श्री रुक्मिणीमाता पालखी सोहळ्याचे गुरुवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी भाविक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी झालेल्या दमदार पावसाने वारकरी आणि शेतकरी दोघांच्याही आनंदात भर घातली.
सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर पालखीचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. महिलांनी रांगोळ्यांनी परिसर सजवला, तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘माऊली-रुक्मिणी’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही वारकऱ्यांचा उत्साह अबाधित राहिला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या घोषात वारकरी पावसातही आनंदाने पुढे मार्गक्रमण करत राहिले. अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पालखीच्या आगमनावेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीच्या कामांना आता वेग मिळणार असल्याने वारकऱ्यांनी या पावसाला “रुक्मिणीमातेचा आशीर्वाद” अशी भावनिक उपमा दिली.
रुक्मिणीमातेच्या माहेर असलेल्या कौंडिण्यपूरहून सासर असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याला वारकरी परंपरेत विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. बार्शीतील मुक्कामानंतर ही पालखी कुर्डूवाडी, मोडनिंब मार्गे आषाढी एकादशीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. वारकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनाने पाणी, आरोग्य सेवा, सुरक्षा, फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिकांची चोख व्यवस्था केली असून, पालखी मार्गावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.





