नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा; बेळगाव ढगा येथील १०० वे खरेदीखत पूर्ण : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्या माध्यमातून खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मौजे बेळगाव ढगा येथील प्रकाश नामदेव पवार यांच्या जमिनीचे खरेदीखत आज यशस्वीरित्या पूर्ण झाले असुन खरेदी प्रक्रियेचे शतक पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे 410 कोटी रूपये किमतीच्या जमिनीची थेट खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेतकरी व जमीनधारकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भूसंपादन प्रक्रियेला अपेक्षित गती मिळत आहे.
१०० वे खरेदीखत पूर्ण झाल्याच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी, उपअभियंता श्री. बिरारीस तसेच विधी अधिकारी श्री. गुंजाळ उपस्थित होते. परिक्रमा मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकरी, जमीनधारक तसेच महसूल प्रशासनाचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.





