इंग्रजी विषयासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. राहुल पालके यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. राहुल भगवान पालके यांना इंग्रजी विषयातील पीएच.डी. संशोधक मार्गदर्शक (Research Guide) म्हणून मान्यता प्रदान केली आहे. या मान्यतेमुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी चार संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे.
इंग्रजी साहित्य, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातील सुमारे १४ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासह संशोधनपर लेखन, शैक्षणिक कार्य आणि विद्यार्थीकेंद्रित मार्गदर्शनाची दखल घेत विद्यापीठाने त्यांची संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे.
डॉ. पालके यांनी आजपर्यंत यूजीसी-नेट, सेट व गेट परीक्षा एकूण २१ वेळा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, महिला अभ्यास (Women’s Studies), भाषाविज्ञान (Linguistics), तुलनात्मक साहित्य (Comparative Literature) तसेच आदिवासी व प्रादेशिक भाषा-साहित्य (Tribal & Regional Language and Literature) या आठ विषयांमध्ये NET पात्रता मिळवली आहे. तसेच इंग्रजी व मराठी या दोन विषयांमध्ये SET परीक्षा उत्तीर्ण केली असून GATE (Humanities & Social Sciences – English) परीक्षाही यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
ते केवळ संशोधक मार्गदर्शकच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी झटणारे हाडाचे प्राध्यापक म्हणूनही ओळखले जातात. राज्यातील विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी यूजीसी-नेट, सेट आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयावर असंख्य व्याख्याने दिली आहेत. तसेच आकाशवाणी सोलापूर आणि आकाशवाणी धाराशिव केंद्रांवरून ‘सेट-नेट परीक्षांचे विश्व’ तसेच ‘स्पर्धा परीक्षांचे विश्व’ या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
डॉ. पालके हे शिक्षक, संशोधक, लेखक आणि कवी म्हणूनही कार्यरत असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संशोधन, अध्यापन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. डॉ. राहुल पालके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या संशोधक मार्गदर्शनाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





