‘काचबिंदू’विषयी जनजागृती अत्यावश्यक ; वेळोवेळी तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते – डॉ.धनंजय चाकुरकर
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे सहसा सहज ओळखता येत नसल्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन योग्य वेळी उपचार घेतल्यास काचबिंदूमुळे होणारे अंधत्व टाळता येऊ शकते,असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी केले.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने ८ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत “Uniting for a Glaucoma-Free World – काचबिंदू मुक्त जगासाठी एकत्र येऊया” या घोषवाक्याखाली जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त दि.९ मार्च २०२६ रोजी नेत्र विभागात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. ज्योती कानडे यांनी काचबिंदू होण्याची कारणे, या आजारापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि समाजात वाढत असलेले काचबिंदूचे प्रमाण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांनी किमान सहा महिन्यांतून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. त्यामुळे काचबिंदूचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार करता येतात आणि अंधत्वाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर उपस्थित होते. नेत्र विभागाचे प्रमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील, डॉ. मुस्तफा पल्ला, डॉ. पवन महाजन, डॉ. सायली कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेत्रचिकित्सा अधिकारी रामराजे बिडवे, बाळासाहेब घाडगे, नर्सिंग स्टाफ श्रीमती. कविता भातलंवडे, श्रीमती. पल्लवी राऊत, समुपदेशक उमेश गोरे यांच्यासह रुग्णालयीन कर्मचारी,तपासणीसाठी आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ.महेश पाटील यांनी मानले.





