दिनधाराशिवमहाराष्ट्र

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक

७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली.या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

आज पोलीस कवायत मैदान क्र.२ येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थिताना संबोधित करताना सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर, नामदेव माने, श्रीपती जावळे, बाबुराव तवले, शेषराव बनसोडे, कलावती उंबरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही देशाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी असून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे व आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे, असे सांगून पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, या राज्यघटनेमुळे भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जात असून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूल्यांवर देशाची उभारणी झाली आहे.जात, धर्म, लिंग वा भाषा यांचा भेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

सरनाईक पुढे म्हणाले की,राज्य सरकार मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय व सुशासन या त्रिसूत्रीवर कार्यरत असून राज्य प्रगतीपथावर आहे.आजच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची,राष्ट्रीय एकात्मता जपण्याची व आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button