विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणानी विविध संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे शहर पोलीस उपआयुक्त सोमय मुंढे, पुणे ग्रामीण पोलीस अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, विजस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, औषधोपचार सेवा, ड्रोन्, सीसीटिव्ही, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अनुयायांची कोणताही प्रकारची गैरसोय होणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही सूचना असल्यास प्रशासनाला कळवाव्यात, त्याचा यावर्षीचा नियोजनात समावेश करण्यात येईल.

अनुयायांना धुळीचा त्रास आणि त्यामाध्यमातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. पाणी पुरवठा सुरळीत राहण्याकरिता पर्यवेक्षकाची नेमणूक करावी. पीएमपीएलने बसेसच्या तपासणीच्याअनुषंगाने आवश्यक ती सर्व माहिती पुणे प्रादेशिक परिवहन विभागास २५ डिसेंबर २०२५ पर्यंत सादर करावी. त्यानुसार परिवहन विभागाने तपासणी करावी. पीएमपीएलच्या वाहनचालकांच्या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा शैल्यचिकीत्सक कार्यालयाने शिबीर आयोजित करावे. गरोदर महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध महिलांकरिता स्वतंत्र रांग करण्याबाबत पोलीस प्रशासनाने नियोजन करावे.

सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकरिता कार्यक्रमस्थळी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष तसेच अनुयांयाच्या तक्रारीची दखल घेण्याकरिता तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांने सन २०१९-२० चा विजयस्तंभ नियोजन आराखडा आणि यावर्षीचा आराखडा याचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यामध्ये तफावत असल्यास यावर्षीच्या आराखड्यात तशा सुधारणा कराव्यात. कार्यक्रमाकरिता होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ लावण्याकरिता मुख्य लेखा.व वित्त. अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी, ती समिती लेखापरिक्षण अहवाल प्रशासनाला सादर करतील. पोलीस विभागाशी समन्वय साधून विजयस्तंभाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर चोख वाहतूक नियोजन करण्यात येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील.

बैठकीत विविध संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी उपयुक्त सूचना केल्या असून त्या सूचनांचा आदर ठेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकारात्मकरित्या अंमलबजावणी केली जाईल, संघटनांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन डुडी यांनी केले.

पाटील म्हणाले, आषाढी वारीच्या धर्तीवर अनुयांना सोई-सुविधा पुरविण्यात येतील, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सोहळा सुरळीतपणे पार पाडण्याकरिता पुरेषा मनुष्यबळ, साधनसाम्रुगी, शौचालय, टँकर, स्वच्छता, पाणीपुरवठा, आदी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, गतवेळीपेक्षा यावेळी शौचालयांची संख्या वाढविण्यात आली आहेत, असेही पाटील म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या