राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१व्या अभ्यासवर्गात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

“संसदीय आयुधे म्हणजे जनतेशी थेट दुवा साधण्याची साधने” : डॉ. नीलम गोऱ्हे

B1न्यूज मराठी नेटवर्क

नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आयोजित ५१व्या संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना “संसदीय आयुधे आणि लोकशाही प्रणालीमध्ये त्यांचे महत्व” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, संसदीय आयुधे ही केवळ विचार मांडण्याची साधने नसून लोकशाही अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि जनाभिमुख करण्यासाठीची प्रभावी कार्यपद्धती आहेत. यावेळी विधिमंडळ सचिव मेघना तळेकर ही प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील समाजसुधारकांची परंपरा आणि लोकशाहीची वैचारिक पायाभरणी स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळेच आजची सक्षम आणि संवेदनशील लोकशाही उभी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विद्यार्थ्यांनी या पार्श्वभूमीची जाण ठेवून काम केले, तर त्यांचे लोकप्रतिनिधित्व अधिक परिणामकारक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संसदीय आयुधांची व्याख्या स्पष्ट करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “संसदीय आयुध म्हणजे तलवार नव्हे, तर विधायक कामकाजाचे सुटसुटीत आणि शिस्तबद्ध रूप.” प्रश्नोत्तरांचा तास, तातडीचे प्रश्न, लक्षवेधी सूचना, अल्पकालीन चर्चा, विधेयकांवरील चर्चा अशा विविध साधनांद्वारे लोकप्रतिनिधी अत्यंत गंभीर प्रश्नांवर शासनाला उत्तरदायी बनवू शकतात, असे त्यांनी सांगितले. केवळ आक्रमक भाषणांनी नव्हे तर तथ्याधारित तयारीने विधानमंडळ परिणामकारक बनते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सभागृहातील शिस्त, संयम, नेमकेपणा यावर विशेष भर देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “लोकप्रतिनिधी ओरडून नव्हे, तर माहिती, तयारी आणि मोजक्या शब्दांतील मुद्देसूद मांडणीनेच जनतेचा विश्वास जिंकू शकतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना संसदीय नियमांचे काटेकोर पालन, वेळेचे व्यवस्थापन आणि विधायक पर्याय मांडण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. फक्त विरोधासाठी विरोध न करता जनहिताचा पर्याय मांडणे हे संसदीय परंपरेचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

तातडीचे प्रश्न आणि लक्षवेधी सूचनांमुळे अनेक जनजीवनाशी संबंधित मुद्दे जलदगतीने सुटलेली उदाहरणे देत त्यांनी संसदीय साधनांची ताकद स्पष्ट केली. शेतकरी आत्महत्या, पिकांचे नुकसान, महिलांविरुद्धचे गुन्हे, पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्यांवर त्यांनी स्वतः विधायक पद्धतीने कसे प्रश्न उपस्थित केले याचे अनुभवही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. “लोकशाही टिकवायची असेल तर संवेदनशीलता, सातत्य आणि समस्येची बहुआयामी समज आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शक उत्तरे दिली. युवा पिढीने विधायक राजकारणाची निवड केली तर लोकशाही अधिक मजबूत आणि उत्तरदायी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उपसभापतींच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचे स्वागत केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या