केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सभापती व उपसभापतींकडून ‘भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी पुस्तक प्रकाशन’ सोहळ्याचे निमंत्रण
B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री महोदयांच्या भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचालीवरील वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन माननीय राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते ९ डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण आज माननीय केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते श्री. नितीनजी गडकरी यांना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले.
या भेटीदरम्यान राज्यकारभार, विकासकामे आणि विधानपरिषदेच्या उपक्रमांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर फलदायी चर्चा झाली. भेटीदरम्यान सभापती व उपसभापती यांनी ‘महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्त्व’ या विषयावरील पुस्तक माननीय गडकरीजी यांना भेट दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दाही दिशा’ हे पुस्तक देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेट स्वरूपात प्रदान केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्र्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. या सदिच्छा भेटीमुळे भावी सहकार्य, संसदीय परंपरा आणि संवाद वृद्धिंगत होण्यास निश्चितच सकारात्मक दिशा मिळाली, असे यावेळी बोलताना सभापती आणि उपसभापती यांनी सांगितले.




