संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल’ व्हावे अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबी, मुख्यमंत्र्यांनी अनाथ युवक युवतींशी वर्षा निवासस्थानी साधला संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई, दि.5 : अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने राज्य शासनाने 1 टक्का अनाथ आरक्षणाचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे 862 अनाथ युवक-युवती स्वावलंबी होऊन समाजासाठी कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो, शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाली असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ मुलांशी संवाद साधला. कार्यक्रमास विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय व लाभार्थी अनाथ युवक युवती उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मलाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन वर्ष झाले. या वर्षपूर्तीची सुरुवातप्रसंगी अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली. निःशब्द भाव खूप बोलणारा असतो, तसा भाव आज माझ्या मनात आहे. शासनात अनेक निर्णय घेतले जातात, अनेक कामे केली जातात, पण काही निर्णय मनाला गहिवर देतात. तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे.

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘संधीची समानता’ हे तत्व आपल्या संविधानात समाविष्ट केले. पण ही समानता केवळ सामाजिक आरक्षणातून मर्यादित राहता कामा नये. अनाथ, दिव्यांग आणि इतर वंचित घटकांनाही संधी मिळायला हवी. त्या विचारातूनच 1 टक्के अनाथ आरक्षणाचा निर्णय झाला. या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात खरा बदल घडला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

“संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल” व्हावे आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणे, हा प्रत्येकाचा धर्म आहे. संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात ‘रोल मॉडेल’ बनावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. जिथे पोहोचलात तिथे थांबू नका. संघर्षातून मिळवलेले यश हे पुढे समाजासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा ठरावी. स्थैर्य मिळाल्यानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात कायम ठेवावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माणसाचे कार्यच त्याला अमरत्व देतं. कार्यातूनच माणूस जिवंत राहतो. म्हणून तुमचं कार्यच तुमची ओळख बनवा, असे सांगून कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अनाथ युवकांचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात विनायक विश्वकर्मा या युवकाने मुख्यमंत्री यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत एक भावस्पर्शी कविता सादर केली. आज घ्यायला नाही सर, काही द्यायला आलोय, तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोय ,तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, पण आम्ही तुम्हाला ‘देवा भाऊच’ म्हणणार

या ओळींनी भावनिक वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या युवकाचे कौतुक करतांना सांगितले की, या कवितेतून उमटणारी कृतज्ञता हीच या निर्णयाची खरी पावती आहे. समाजासाठी देण्याची भावना जर प्रत्येकामध्ये निर्माण झाली, तर तेच खरे परिवर्तन आहे. या संवादात उपस्थित युवकांनीही आपल्या अनुभवांची मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या आरक्षणामुळे त्यांना शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. आज आम्ही इतर अनाथ मुलांसाठी प्रेरणा आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अभय तेली व आभार प्रदर्शन जाणीव वृद्ध आश्रमाचे संचालक मनोज पांचाळ यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या