बार्शी नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जाहीर पाठिंबा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषदेची निवडणूक 2025 सध्या बार्शी शहरांमध्ये सुरू आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीला सत्तेतून हटविण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पाक्ष केंद्रात व राज्यात सत्तेवरती आहे. सत्तेवर राहून ते धर्मांतर राजकारण करत शेतकरी, कामगार , दलित , आदिवासी , महिला, युवक, विद्यार्थी यांच्या हिताच्या विरुद्ध काम करून भांडवलदारांचे हित पाहत आहेत.
त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष बार्शी शहर कौन्सिलच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय विचारधारेप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा समाजात धर्मांध राजकारण करून समाजाचे व कष्टकरी जनतेचे नुकसान करीत असल्याने बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बार्शी शहरातील सर्व सभासद हे महाविकास आघाडीला मतदान करतील; व महाविकास आघाडीला नागरिकांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करतील . बार्शी शहरातील कष्टकरी वर्गाने महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्ष बार्शी शहर व आयटक कौन्सिलच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा सचिव तथा राज्य कौन्सील सदस्य कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व पदाधिकारी उपस्थित होते.




