राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शीचा कुणाल लोखंडे याचा डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन डायव्हिंग स्पर्धा मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शीचा विद्यार्थी कुणाल लोखंडे (बीए.एलएल.बी. भाग १) यांनी उत्तुंग कामगिरी करत महाविद्यालयाचा मान उंचावला.
कुणालने ३ मीटर डायव्हिंग स्प्रिंग बोर्ड आणि १० मीटर डायव्हिंग या दोन्ही प्रकारांत तृतीय क्रमांक पटकावित उल्लेखनीय प्रदर्शन केले.
स्पर्धेपूर्वी व स्पर्धेदरम्यान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्तप्रसाद मनोहर सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि कुणालच्या मेहनतीचा उत्कृष्ट परिणाम या स्पर्धेत दिसून आला.
कुणालच्या कामगिरीबद्दल महाविद्यालयात शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




