अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतील “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करावेत. अमली पदार्थांचे चक्र मोडणे ही सामूहिक जबाबदारी असून, हे उद्दिष्ट गाठण्यात नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे. अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अमली पदार्थ संदर्भात प्रभावी नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बसस्थानक, रेल्वे स्थानक आदि ठिकाणी अमली पदार्थविरोधी जनजागृती फलक प्रदर्शित करावेत. दि. 18 नोव्हेंबर रोजी रेल्वे स्थानकावर पथनाट्य सादर करावे. ग्रामपंचायत बैठकीत याबाबत संकल्प करण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषि विभागाने गांजा लागवड होत नसल्याबद्दल अहवाल सादर करावा. उद्योग विभाग, एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण विभागांनी कारखाने व बंद गोदामांची कसून तपासणी करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
अमली पदार्थविषयातील भविष्यकालिन संकट व धोके लक्षात घेऊन अमली पदार्थांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने व जाणिवपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतनसह जिल्ह्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयात नियमितपणे अमली पदार्थ विरोधी माहिती सांगावी. यासाठी एनएसएसच्या समन्वयाने स्वयंसेवकांना जबाबदारी नेमून द्यावी. वसतिगृहांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी. रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या रेल्वेंवर विशेष नजर ठेवावी. गांजा व तत्सम पदार्थांची तस्करी होत नसल्याची वेळोवेळी खात्री करावी, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, शासकीय रूग्णालयाचे डॉ. विभीषण सारंगकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.




