नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ असल्याचे सांगून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तरुणांच्या मनातील प्रत्येक कल्पना ही नाविन्यता असून स्टार्टअप्सच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला नवउद्योजक बनण्याची संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुहू येथील विद्यापीठ परिसरात झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शिक्षणाचे महत्त्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकाऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्रॉंग पामे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव, ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्या काळात भारतरत्न महर्षी कर्वे यांनी १९१६ मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. राज्य शासनाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार केले आहे. तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याची सरकार आणि विद्यापीठांची भूमिका असून राज्य शासन प्रत्येक टप्प्यावर नवउद्योजकांना साहाय्य करीत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आज नवकल्पनेतून केवळ नवे उत्पादन नव्हे, तर जीवन अधिक सुलभ केले जात आहे. एखादी कल्पना जेव्हा बाजारपेठेत रूपांतरित होते, तेव्हा ती अर्थव्यवस्थेला गती देते. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्समुळे आता नव्या कल्पनांना वेग मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमामुळे आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकॉनॉमी बनला असून लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात महिला उद्योजकांनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाची पाहणी करून सर्व नवोन्मेषकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वैद्यकीय, कृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट तीन स्टार्टअप कल्पनांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्री इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात शिक्षण आणि नाविन्यता क्षेत्रात वेगाने काम होत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात महाराष्ट्र या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण आणि नावीन्यता क्षेत्रात महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख करून शासन एसएनडीटी विद्यापीठाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव यांनी प्रास्ताविकाद्वारे ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ बाबत माहिती दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या