जिल्ह्यात खरीप पिकांसह फळबागांचेही पंचनामे करावेत – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरसदृश्य परिस्थितीमुळे खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी सर्व फळबागांचेही पंचनामे करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिले. करमाळा तालुक्यातील कोर्टी, सरपडोह व बिटरगाव श्री या गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, सिना नदीच्या महापुरामुळे नदीकाठावरील शेती पूर्णतः उध्वस्त झाली असून काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी भरलेले असून पंचनामे करण्यासाठी सर्कल व तलाठी जाऊ शकत नाहीत, त्यामुळे पंचनामे ड्रोनच्या माध्यमातून करण्याची मागणी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली असल्याचे सांगितले.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील जास्त नुकसान लक्षात घेता येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत शासनाकडून मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, मंगेश चिवटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, महेश चिवटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.




