बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची मागणी; माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भारणे यांची भेट घेतली
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मंत्रालयात आज बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भारणे यांची भेट घेतली. या भेटीत बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या मोठ्या नुकसानाची माहिती देत तात्काळ भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
प्रतिनिधी मंडळाने कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. खरीप हंगाम २०२५-२६ साठी पीक विमा कंपनीने बदललेले निकष तात्काळ पूर्ववत करावेत, शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सोय करावी, तसेच पीक कापणी प्रयोग न करता नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
कृषी मंत्री दत्ता मामा भारणे यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत तातडीने योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.




