ओ.बी.सी प्रवर्गातील युवक-युवतीकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

चंद्रपूर, दि.18 : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी जिल्हा, तालुका व गावपातळीपर्यंत राबविल्या जातात.

एक लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना : शासनाने इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरु करण्याकरीता लक्ष रुपयांपर्यतची शुन्य व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये 2085 रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. पंरतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष पर्यंत असावे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्यांना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 10 लक्ष पर्यंत. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 20 लक्ष पर्यंत.

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता 8 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 0.1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा अधिक असावा. सदर योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 15 लाखांपर्यंत : समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे. बँकेमार्फत लाभार्थीना 15 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्क्यांच्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. तसेच कुटुंबातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लक्ष पर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेब पोर्टल www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.

5 लक्ष पर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना : बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रक्कमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल. सदर योजनेत अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष पर्यंत असावे.

या महामंडळामार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर, दूरध्वनी क्रमांक 07172-262420 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर येथील जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या