प्रा. किरण देशमुख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
Oplus_16908288
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ज्ञानाचा प्रसार, विद्यार्थ्यांवरील प्रेम, शैक्षणिक तसेच सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व यामुळे आपल्या क्षेत्रात सतत आदर्श ठरणाऱ्या प्रा. किरण राजाराम देशमुख यांना लायन्स क्लब बार्शी महाराष्ट्र यांच्यावतीने २०२५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार, १३ सप्टेंबर २०२५, रोजी दुपारी ३:०० वाजता, कसपटे फार्म हाऊस, बायपास, परांडा रोड, बार्शी येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. किरण सरांचे संपूर्ण शिक्षण जगदाळे मामांच्या संस्थेत झाले असून ते शाळेपासून महाविद्यालयापर्यंत गुणवंत विद्यार्थी आणि व्हालिबॉल खेळाडू म्हणून ओळखले जातात सध्या ते परांडा येथील एका महाविद्यालयात मागील २३ वर्षांपासून उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अनेक विद्यार्थी शैक्षणिक यश मिळवतात. यंदाच्या वर्षी देखील त्यांच्या महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी निवडले गेले आहेत.
ते बार्शी क्रिकेट असोसिएशनचे सध्या सचिव असून असंख्य युवा खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या खेळगिरीला दिशा दिली आहे.
शारीरिक शिक्षण विषयात विशेष कार्य करणारे प्रा. किरण सर MA, MEd, MP.Ed अशी शैक्षणिक पात्रता बाळगतात. त्यांच्या Ph.D. साठीचा शारीरिक शिक्षणातील समस्यांवरील प्रबंध अंतिम टप्प्यात आहे. प्रा. किरण सर यांची सामाजिक जाणीव देखील तितकीच प्रखर असून नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचे नावही चर्चेत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आजही त्यांचे नाव संस्थेत आणि समाजात आदराने घेतले जाते.




