शेतकऱ्याचा खून केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शेजारच्या शेतकऱ्याची शेती वहिवाटतो या कारणावरून शेतकऱ्याचा खून केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. माढा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४९/२०२५ नुसार आरोपी भिवा संपती बुद्रुक रा. बुद्रुकवादी ता. माढा जि. सोलापूर याच्यावर शेत वहिवाटीच्या कारणावरून कांतीलाल ज्ञानदेव माने या शेतकर्याचा लोखंडी कोयत्याने, गळ्यावर, डोकीत, कपाळावर व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारलेच्या आरोपावरुन मयताच्या पत्नीने बीएनएस कलम – १०३(१), ३५१(३), ३५२, ३(२) व अनुसूचित जाती-जमाती अधिनियम ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
कांतीलाल माने हे गावातील संदीप पाटील यांचे शेत वहीवाटत होते. याचा राग भिवा बुद्रुक याला होता. कांतीलाल हे शेतातील विहिरीवरील मोटार सुरु करण्यासाठी गेले असता भिवा बुद्रुक याने लोखंडी कोयत्याने, गळ्यावर, डोकीत, कपाळावर व काठीने मारहाण करून कांतीलाल यांचा खून केला. सदर प्रकरणातील आरोपी भिवा संपत्ती बुद्रुक याने त्यांचे वकिलामार्फत बार्शी येथील मा. अतिरिक्त व सत्र न्यायाधीश मा. व्ही. के. मांडे साहेब यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यावेळी मूळ फिर्यादिच्यावतीने अॅड. विवेक गजशिव यांनी काम पाहिले. सदरील जामीन अर्जाचे सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीने तिचे वकील अॅड. विवेक गजशिव यांचेमार्फत लेखी युक्तिवाद व प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या जामीन अर्जास विरोध केला. सदरचा लेखी युक्तिवाद व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे साहेब यांनी आरोपी भिवा संपती बुद्रुक याचा जामीन अर्ज नामंजूर करून फेटाळला. याकामी मूळ फिर्यादीतर्फे अॅड. विवेक गजशिव, अॅड. राहुल पाटील,अॅड. श्रीराम काशीद यांनी काम पाहिले.




