बार्शी शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला ; नागरिक त्रस्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
अपघातांच्या घटनेत वाढ, कुत्रे चावण्याच्याही गंभीर घटना, दुर्गंधीचा सामना
बार्शी : शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मोकाट कुत्र्यांपासून संरक्षण करण्यांसाठी नागरिकांनी अनेक ठिकाणी पाण्याच्या बॉटलममध्ये लाल पाणी भरुन ते गेटवर बांधल्याचे तसेच परिसरात ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्रे हे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणांवर भुंकत असून त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत असून कुत्र्यांच्या मोकाट फिरण्यांमुळे ते रस्त्यांवर कुठेही विष्ठा करतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण होत असून त्याच्यापासून दुर्गंधी होत आहे. या-चा नागरिकांना सामना करावा लागतो आहे.
मोकाट कुत्रे चावण्याच्याही गंभीर घटनाही शहरामध्ये घडल्या असून कुत्र्यांच्या प्रचंड झुंडीच्या झुंडी सर्वत्र पाहायला मिळत आहेत. शहरातील मंगळवार पेठ , मुल्ला गल्ली, धस पिंपळगाव रोड, भवानी पेठ, शाहीर अमर शेख चौक, तेलगिरणी चौक,एस.टी. स्टॅण्ड परिसर , पारधी कॅम्प, सोलापूर रोड, लहूजी वस्ताद चौक, टिळक चौक,सुभाषनगर ,ताडसौंदणे रोड, 422 चौक, गाडेगाव रोड, परंडा रोड, महेदी नगर, उपळाई रोड, शिवाजी नगर, अलिपूर रोड, तुळजापूर रोड, मांगडे चाळ,नाळे प्लॉट, मार्केट यार्ड परिसर, भवानी पेठ , कासारवाडी रोड या भागात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या टोळीच्या टोळी पाहावयास मिळत आहेत. यातील काही भागात यांचा त्रास मोठ्या प्रमाणांवर असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना, दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांसह अबालवृद्ध व महिला आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.
कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणांत असणाऱ्या टोळ्या रस्त्यांवर मोकाट फिरण्यांमुळे छोटे – मोठे अपघात होत असून नागरिकांना गंभीर ईज्जा होत आहेत त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांनी नगर पालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिक करताना दिसत आहेत.