जवाहरलाल नेहरु विद्यापीठात श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन

0

“मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, 24 : भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास जेएनयूसारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “युनेस्कोने शिवरायांच्या 12 किल्ल्यांना ‘मराठा मिलिट्री लँडस्केप’ म्हणून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. शिवाजी महाराजांनी सह्याद्री, पश्चिम घाट आणि समुद्रकिनारी अभेद्य किल्ले बांधून परकीय धोके ओळखले आणि मराठ्यांना संपूर्ण भारतात आपला झेंडा फडकवण्यास प्रेरित केले. शिवरायांच्या युद्धनीतीचा आजही जगभरात कौतुक होते आहे. महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरीक शक्तीचे उदाहरणं असून शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याची स्थापना झाली आहे. मराठी माणसामध्ये विजिगीषूवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजविली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. आपल्या नेव्हीच्या ध्वजावर राजमुद्रा लावण्यात आली आहे आणि आता मराठीची राजमुद्रा देखील दिल्लीत लागली आहे. आजही मराठी साहित्य, मराठी नाट्यसृष्टी ही सर्वोत्तम आहे. थिएटर देखील ज्या भाषेने टिकवले ती भाषा म्हणजे मराठी. सगळ्या विद्यापीठांत मराठी भाषेवर संशोधन झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. जेएनयू परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली असून हा पुतळा देशासाठी बलिदान आणि समाजसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी भाषा केंद्र: सांस्कृतिक गौरव – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी जेएनयूमधील मराठी अध्यासन केंद्राची स्थापना हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे नमूद केले. काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचे गाव, परदेशात मराठी बृहन मंडळे निर्माण करणार असल्याचे सांगितले. यावेळी नाशिक येथील विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रण देत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जेएनयूमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ सामंत यांनी यावेळी सांगितले.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित यांनी मराठी साहित्य, नाटक आणि कवितेचे महत्त्व विषद केले. प्रा. पंडित यांनी ‘सिंधुदुर्ग संवाद’ या राष्ट्रीय संवाद कार्यक्रमाची घोषणा केली आणि जेएनयूला समानता, गुणवत्ता आणि नाविन्यावर आधारित अग्रगण्य विद्यापीठ असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत 50 भारतीय भाषांच्या अभ्यासाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी मराठी विद्यार्थ्यांना जेएनयूमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

एतदेशीय सामरिक धोरणाचे महत्व व अधोरेखन’ या अहवालाचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उद्घाटन प्रसंगी ‘स्वराज्य नॅशनल सेक्युरीटी सेमिनार’ या चर्चासत्रावरील ‘एतदेशीय सामरिक धोरणाचे महत्व व अधोरेखन’ या अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्ययन केंद्राद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

21-22 मार्च 2025 रोजी जेएनयू येथील ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’तर्फे ‘स्वराज्य नॅशनल सेक्युरीटी सेमिनार’ आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्राचा मुख्य उद्देश भारताच्या स्वदेशी धोरण आणि विचारसरणीच्या उगमाचा अभ्यास व प्रचार करणे हा होता.

या चर्चासत्रामध्ये इतिहास, संस्कृती, तंत्रज्ञान आणि संरक्षण या विषयांवर आंतरशाखीय चर्चाद्वारे भारताचे राष्ट्रीय धोरण आणि रणनीती यासाठी अनेक कल्पनांची मांडणी करण्यात आली. या सर्व चर्चेची विस्तृत मांडणी आता या अहवालाद्वारे वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, धनंजय महाडिक, मेधा कुलकर्णी, हेमंत सावरा, अनिल बोंडे, अजित गोपचाडे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यासह केंद्र शासनाचे विविध विभागातील अधिकारी, जेएनयू मधील प्राध्यापक आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या