विविध खेळाच्या उत्कृष्ट शालेय खेळाडूंचा ‘डाटाबेस’ तयार करा – जिल्हाधिकारी विकास मीना
जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावा, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये पाठविण्याचे निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क
उत्कृष्ट शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष क्रीडा स्पर्धा घेणार
यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यात विविध खेळाचे अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. परंतू त्यांच्यावर ‘फोकस’ होत नाही. स्पर्धा संपल्या की विद्यार्थी खेळांपासून दुर होतात. त्यामुळे जिल्ह्यात तालुकानिहाय उत्कृष्ट शालेय खेळाडूंचा ‘डाटाबेस’ तयार करा. खेळ प्रकारनिहाय या खेळाडूंची आपसात स्पर्धा घेऊन त्यात जिल्हास्तरासाठी निवड करा व त्याच्यासाठी वर्षातून दोनदा विशेष स्पर्धा आयोजित करा, असा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.
येत्या 22 जुलै पासून जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, पोलिस उपअधीक्षक सुनिल हुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 22 जुलै पासून शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत असून 30 सप्टेंबरपर्यंत स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेदरम्यान मैदाने व तेथील स्वच्छतागृहांची साफसफाई त्यात्या नगरपरिषद, नगरपंचायतींनी करावी. खेळादरम्यान विद्यार्थ्यांनी ईजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाद्वारे प्रथमोपचार सुविधा, स्पर्धा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
स्पर्धा संपल्यासंपल्या शिक्षण व क्रीडा विभागाने स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करावे. या विद्यार्थ्यांमधून खेळ प्रकारनिहाय ठराविक विद्यार्थ्यांची निवड करावी. अशा खेळाडूंवर विशेष लक्ष देण्यात यावे. त्यांच्यासाठी आपसात दिवाळीच्या दरम्यान व परिक्षा संपल्यानंतर अशा दोनदा विशेष स्पर्धा घेण्यात याव्या. या स्पर्धेत विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यासाठी विशेष प्रशिक्षणासह विविध सुविधा उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या निर्देशान्वये सर्व शासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानीत शाळांनी किमान पाच क्रीडा स्पर्धेत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे. परंतू काही शाळा विद्यार्थ्यांना पाठवत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पाचच नव्हे तर सर्व क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांना सहभागी होता आले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत सर्व शाळांना सक्त सूचना देण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षण व क्रीडा विभागाला दिल्या. यावेळी यावर्षीच्या तालुका, जिल्हास्तरावर होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, स्पर्धांचे नियोजन आदींची सविस्तर माहिती असलेल्या पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.




