महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या “डॉ.सूर्यकांत घुगरे संशोधनग्रंथ पुरस्काराने’ डॉ.शर्मिला वीरकर सन्मानीत

डॉ.एम.एस.कऱ्हाडे यांच्या हस्ते “डॉ.सूर्यकांत घुगरे संशोधनग्रंथ पुरस्कार’ स्वीकारताना डॉ.शर्मिला वीरकर
B1न्यूज मराठी नेटवर्क
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा “डॉ.सूर्यकांत घुगरे
संशोधनग्रंथ पुरस्कार’ डॉ.शर्मिला वीरकर यांना प्रदान
बार्शी : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३७ वे अधिवेशन पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात दि.१ आणि २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. तत्त्वज्ञान विषयातील संशोधनात्मक ग्रंथांना अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रत्येक वर्षी “डॉ.सूर्यकांत घुगरे संशोधनग्रंथ पुरस्कार’ देण्यात येतो. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानपत्र व रोखरक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षीचा पुरस्कार मुंबई विद्यापीठातील डॉ.शर्मिला वीरकर यांना प्रदान करण्यात आला.
डॉ.वीरकर यांच्या “क्रिटीकल इव्हॅल्युएशन ऑफ दि गीतारहस्य’ ग्रंथासाठी या पुरस्काराची निवड करण्यात आली. डॉ.एम.एस.कऱ्हाडे यांच्या हस्ते आणि अॅड्. जी.डी.तिवारी, परिषदेचे अध्यक्ष डाॅ.नागोराव कुंभार, डॉ.सुनिल गवरे, डॉ.ग्यानदेव उपाडे, डॉ.अमन बगाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तत्त्वज्ञान, कोकणातील सामाजिक चळवळींचा विचार या दोन प्रमुख विषयांवर विचारवंतांची व्याख्याने संपन्न झाली. या परिषदेत तत्त्वज्ञानाच्या इतर काही विषयांवर शोधनिबंध सहभागी अभ्यासकांनी सादर केले. बार्शीतील झाडबुके महाविद्यालयाचे डॉ.घुगरे यांचे पीएच्.डी. तसेच डी.लिट् पर्यंत शिक्षण झालेले असून महाराष्ट्रातील समाजशास्त्राचे ते ज्येष्ठ संशोधक म्हणून परिचित आहेत.