या निवडणुकीत आम्ही विजय खेचून आणू : आमदार राजेंद्र राऊत
बार्शी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा विजयी संकल्प मेळावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा येत्या ८ तारखेला भगवंत मैदान येथे होणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आ.) व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी कार्यकर्त्यांसाठी विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देत निवडणुकीत विजय खेचून आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
आमदार राजेंद्र राऊत यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा येत्या ८ तारखेला भगवंत मैदान येथे होणार असून, या सभेला सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता त्यांना सडेतोड उत्तर देण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी काम करा व सरकारच्या माध्यमातून बार्शी शहर व तालुक्यात केलेल्या विकास कामांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्वांना केले. यावेळी शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यासह मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.