निधन वार्तामहाराष्ट्रसोलापूर

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू रामचंद्र जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : शहरातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केरू रामचंद्र जाधव (वय ६३) यांचे सोमवारी, ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

केरू जाधव यांनी अत्यंत कष्टातून शिक्षण घेत पोलीस खात्यात रुजू होण्याचे स्वप्न साकारले. प्रामाणिकता आणि निष्ठेने सेवा बजावल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी पोलिस दलात उल्लेखनीय योगदान दिले. पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले होते.

केरू जाधव हे समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. समाजातील वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे निःस्वार्थी योगदान दिले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगा, सुना, नातवंडे आणि एक भाऊ असा परिवार आहे.

सोलापूरच्या न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. जुना कारंबा नाका भागातील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सहकारी आणि नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

केरू रामचंद्र जाधव यांच्या निधनाने सोलापूर शहराने एक समर्पित समाजसेवक गमावला असून त्यांच्या कार्याची आठवण सोलापूरकरांच्या मनात कायम राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button