विधानसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ९२३ गुन्हे दाखल; ८४३ व्यक्तींना अटक
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि. ५: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून ९२३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ८४३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९६ वाहनासह ३ कोटी ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५० प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून आतापर्यंत १२ प्रकरणात रक्कम ९ कोटी ८० हजार रुपये इतक्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. या काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे दोन गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यांमध्ये ३ लाख ६४ हजार १७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार १ ऑक्टोबर २०२४ पासून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टीने एकूण १८ तात्पुरते चेकनाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या विहित वेळेत चालू व बंद होतील तसेच अल्पवयीन ग्राहकांना मद्यविक्री होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तीचे नियमित निरीक्षण करण्यात येत आहे.
१८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आणि २३ नोव्हेंबर २०२४ मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस (ड्रायडे)
जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापसून ते २० नोव्हेंबर २०२४ मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत आणि २३ नोव्हेंबर २०२४ मतमोजणीच्या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघाचे अधिकृत निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (ड्रायडे) घोषित करण्यात आलेला आहे. या काळात जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.