कॉसमॉस बँकेच्या ‘स्मॉल फायनान्स बिझनेस डिपार्टमेंट’चे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन
देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना कर्जपुरवठा आवश्यक- राज्यपाल
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि.२८: लघु उद्योजक देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य आधार असून देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. यादृष्टीने कॉसमॉस सहकारी बँकेचा आदर्श घेऊन सर्व सहकारी बँकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
कॉसमॉस बँकेने सुरु केलेल्या ‘स्मॉल फायनान्स बिझनेस डिपार्टमेंट’ या स्वतंत्र विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वामी गोविंद देव गिरी महाराज, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, उपाध्यक्ष यशवंत कासार, कार्यकारी संचालक अपेक्षिता ठिपसे यावेळी उपस्थित होते.
बँकांनी व्यक्तिगत सेवा, कार्यसंस्कृती आणि आत्मविश्वासाच्या आधारे छोट्या घटकांची काळजी घेत त्यांना अर्थसहाय्य केले पाहिजे, असे सांगून राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले, छोटे कर्जदार कर्ज परत करण्यात तत्पर असतात. त्यामुळे लघुवित्तपुरवठा क्षेत्रात एनपीएचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यादृष्टीने सूक्ष्म व लघुउद्योजकांना कोणत्याही अडथळ्यावीना सुलभतेने आणि तात्काळ कर्ज पुरवठा व्हावा यासाठी कॉसमॉस बँकेने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून याचा अन्य सहकारी बँकांनी आदर्श घ्यावा.
राज्यपाल पुढे म्हणाले, गरजू सूक्ष्म व लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करुन बँकेने त्यांच्या आकांक्षांना पाठबळ दिले असून बँकेची ही कृती ‘सहकारातून समृद्धी’ या धोरणाशी सुसंगत आहे. बँकेने समर्पण भावनेने केलेल्या योगदानामुळे सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत झाली आहे. मागील काळात झालेल्या सायबर हल्यातून बँकेने उभारी घेतली हे कौतुकास्पद असून, आर्थिक क्षेत्रातील अशा फसवणुकीबाबत बँकेने मोठ्या प्रमाणावर विशेषत: तरुणांमध्ये जनजागृती करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.
बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले, छोट्या उद्योजकांच्या, ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन बँकेने २० हजारापासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अतिशय किफायतशीर व्याजदरात देण्यास सुरूवात केली आहे. सतत बदलणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बँक सातत्याने सेवकांना प्रशिक्षण देते, तंत्रज्ञान अद्ययावत करण्यावर भर देते. सहकार क्षेत्रातील देशातील दुसरी क्रमांकाची सहकारी बँक असणारी कॉसमॉस बँक सात राज्यातील ११८ शाखांमधील सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, बँकेचे कर्मचारी यांची काळजी घेत आहे, असेही काळे म्हणाले.
स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, कॉसमॉस बँकेने सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढविला आहे. सामान्य माणसाच्या विकासाबरोबरच देशाची प्रगती होत आहे. आगामी काळ हा भारताचा सुवर्ण काळ असेल, असे स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती ठिपसे यांनी प्रास्ताविकात नवीन विभाग सुरू करण्यामागच्या उद्देशाबद्दल माहिती दिली.उपाध्यक्ष यशवंत कासार यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. बँकेचे सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.