बार्शी शहरात निवडणूक काळातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी, २७ ऑक्टोबर २०२४ – आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याने विविध कारवाई केली आहे.

शहरातील कायदा-सुव्यवस्था सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत उपद्रवी व शरीराविषयी गुन्हे दाखल असलेल्या पाच इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५/५६ अंतर्गत तडीपार करण्यात आले आहे. तसेच, आणखी १३ व्यक्तींवर तडीपाराची सुनावणी सुरू असून लवकरच आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय, एका इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई सुरु आहे.

बेकायदा दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी ३२ इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ अंतर्गत कारवाई केली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १२६ नुसार, एकूण ४८१ इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आणखी ३०० ते ३५० इसमांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई महेश गळगटे, पोसई कुंजीर, आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

निवडणूक काळात सोशल मिडियाचा गैरवापर करून धार्मिक, जातीय किंवा राजकीय तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बार्शी शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर लक्ष ठेवून आहेत.

२६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP) यांच्या समवेत शहरातील संवेदनशील भाग, मुख्य बाजारपेठ आणि संमिश्र वस्तीमध्ये पथसंचलन केले. या पथसंचलनाचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे हा होता. पोलिसांची ही कडक कारवाई निवडणूक काळातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या