मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि.१४: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्यावतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत विविध साधने खरेदी करण्यासाठी निधी वितरण करण्यात येत असून या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली आहे.
पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा आदी सहाय्यभूत आवश्यक साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिले जातात.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संलग्न बॅकेच्या बचत खात्यात ऑनलाईन पद्धतीने करण्याऐवजी पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाव्दारे एकवेळ एकरकमी ३ हजार रूपयेच्या मर्यादेत ऑफलाईन पद्धतीने वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज मुदतीत सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयास सादर करावेत, असे आवाहनही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.