हेल्थ क्लब च्या माध्यमातून बार्शी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘बार्शी हाफ मॅरेथॉन 2024’ चे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील फ्रेंड्स बहुउद्देशीय संस्था संचलित हेल्थ क्लब च्या माध्यमातून रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बार्शी हाफ मॅरेथॉन – 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईला ड्रग्स पासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने ‘से नो टू ड्रग्स… रन फॉर हेल्थ… रन फॉर बार्शी…’ असे या मॅरेथॉनचे घोषवाक्य असणार आहे.
बार्शीच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे टाईम चीपद्वारे (BIB) मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, सर्टिफिकेट व मेडल प्रदान केले जाणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांसाठी झुंबा, फिजीओथेरपीस्ट व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी टाईम चीपद्वारे (BIB) मॅरेथॉन स्पर्धा होणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच स्पर्धा आहे. ही स्पर्धा वयोगटांनुसार 3 कि.मी. (60 वर्षांपुढील स्पर्धक), 5 कि.मी. (खुला गट) , 10 कि.मी. (वयोगट -16 ते 34 व 35 ते 60 पुरूष व महिला) आणि 21 कि.मी. (वयोगट -16 ते 34 व 35 ते 60 पुरूष व महिला) अशा चार टप्प्यांमध्ये होणार आहे.
स्पर्धेची सुरुवात ग्रामदैवत श्री भगवंतांच्या आशीर्वादाने श्री भगवंत मैदान, बार्शी येथून पहाटे 5 वाजता होणार असून पुढे परांडा रोड वरून परंडा चौक, लक्ष्याची वाडी ते हिंगणगांव बस स्टॉप च्या पुढे व तेथून परत अशा मार्गाने जाऊन श्री भगवंत मैदान येथेच मॅरेथॉनचा शेवट होणार आहे. या मॅरेथॉन साठी देशभरातून स्पर्धक येणार असून स्पर्धकांनी कुटुंबासह या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून या आरोग्य चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/barshi-half-marathon-2024-231333 या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तसेच 3 किमी साठी ऑफलाईन फॉर्म जवाहर मुद्रणालय, मल्लाप्पा धनशेट्टी रोड, बार्शी, जि. सोलापूर (मो.नं.9970095000) येथे उपलब्ध आहेत.