रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकमध्ये ६३ लाखाचा गुटखा, बार्शी पोलिसांकडून ८८ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त
बार्शी शहर पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : गेल्या काही दिवसांपासून अवैध गुटखा वाहतुकीवर बार्शी पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. शहरातून अशाप्रकारे संशयित वाहतूक होत असल्यास संबंधिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच अशाप्रकारे कारवाई केल्यानंतर याच महिन्याच्या शेवटच्या दिवशी देखील बार्शी पोलिसांनी अशीच दबंग कामगिरी केली आहे. शहर हद्दीतील लातूर रोडवर उभा असलेल्या ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या एका पथकाने ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये ६३ लाख ७० हजार किंमतीचा हिरा कंपनीचा गुटखा त्यामध्ये हिरा पान मसालाच्या एकूण ३९० गोण्या ताब्यात घेण्यात आल्या तर वाहतूक करणारा ट्रक असा एकूण ८८ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयटी कॉलेजवळ कारवाई
बार्शी-लातूर रोडवरील एमआयटी महाविद्यालयाजवळ एक ट्रक उभा असल्याची माहिती बार्शी शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले उभा असलेल्या ट्रकमध्ये नेमके काय आहे याचा शोध सुरु झाला. सुरवातीला ट्रकमधील दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र, तपासाअंती ट्रकमध्ये हिरा कंपनीचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी ट्रक आणि त्यामधील दोघांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये एकूण ६३ लाख ७० हजाराचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिसांकडून एकाचा फोन ताब्यात
गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास बार्शीतील एकाचा फोन आला होता. यासंबंधी बार्शी पोलिसांनी माहिती दिली नसली तरी सुत्रांच्या माहितीनुसार बार्शीतील एका व्यक्तीचा फोन संबंधित ट्रक चालकास आला होता. त्यानुसार त्या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. गुटखा वाहतूक आणि त्या व्यक्तीचे काय कनेक्शन आहे याचा तपास देखील होणे तेवढेच गरजेचे आहे. त्या व्यक्तीने ट्रक चालकास फोन केला होता त्यावेळी चालकाचा मोबाईल हा पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यामुळे गुटखा वाहतूक आणि बार्शी कनेक्शन काय आहे का? याचा तपास होणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
मालाची वाहतूक करताना मजुरांचीही दमछाक
पोलिसांनी जो ट्रक ताब्यात घेतला आहे त्यामध्ये गुटख्याच्या तब्बल ३९० गोण्या आणि तंबाखूच्या २०० गोण्या अशा मिळून ५९० गोण्या होत्या. गुटखा तपासणीसाठी ट्रकच्या खाली उतरवताना मजुरांची अक्षरश: दमछाक झाली होती. तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही दाखल झाले होते.
महिन्याभरात बार्शी पोलिसांची दुसरी कारवाई
एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच पोस्ट चौकामध्ये बार्शी पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला होता. त्यानंतर ही शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षख हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि. सुधीर तोरडमल, सपोनि उदार, कर्णेवाड, शिरसट तर गुन्हे शाखेचे शैलेश चौगुले, अमोल माने, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, रविकांत लगदिवे, अविनाश पवार, अंकुश जाधव यांनी ही कारवाई केली आहे.