धुम्रपान अंमलबजावणी मोहिम राबणार ; दंड व धाडसत्र होणार
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा 2003 ची माहिती व्हावी आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सोलापुरातील सामाजिक संस्थांची कार्यशाळा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे झाली. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष सोलापूर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाधिकारी भगवान भुसारे हे होते.
यावेळी मनपाचे क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. सय्यद, विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी उपस्थित होते. कार्यशाळेत सामाजिक संस्थांचा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात व जिल्हा व तालुकास्तरीय समितीमध्ये सहभाग तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे धूम्रपान थांबवण्यासाठी कोटपा 2003 अंतर्गत जनजागृती, धाडसत्र, दंड करणे यामध्ये सहकार्य याबाबत चर्चा करण्यात आली. कोटपा कायदा कलम चार, कलम सहा व सहा ब या कायद्याची अंमलबजावणी, कार्यक्षेत्र तसेच दंडाची तरतूद याबाबत सविस्तर माहिती विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी दिली तर जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाधिकारी भगवान भुसारे यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात सामाजिक संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन करत तंबाखूचे दुष्परिणाम व सामाजिक प्रश्न यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत मूल्यमापन अधिकारी दिनेश राठोड, सहाय्यक पर्यवेक्षक कृष्णा सकट, क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे अमित महाडिक, निरामय आरोग्यधाम संस्थेचे सतीश राठोड, सोलापूर जिल्हा कार्य समितीचे गिरीश कोनापुरे, दयानंद बाळशंकर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे वीरेंद्र परदेशी, सेवाधाम ट्रस्टचे महेश काळोखे, हर्षल अहिरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.