मराठी भाषेबरोबर ४ भाषेत ‘घर बंदूक बिरयानी’ ०७ एप्रिलला प्रदर्शित : नागराज मंजुळे
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापुरातील पत्रकारांशी कलाकारांनी साधला संवाद
सोलापूर : आटपाट आणि झी स्टुडिओज् निर्मित,हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिरयाणी’ चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येतोय.या चित्रपटात नागराज मंजुळे,सयाजी शिंदे,आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.येत्या ०७ एप्रिल रोजी ‘घर बंदूक बिरयानी’ एकाच वेळी मराठीसह हिंदी,तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होत असल्याची माहिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक तथा अभिनेते नागराज मंजुळे यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट एक वेगळा विषय घेऊन सिनेरसिकांच्या भेटीस येत आहेत.त्याचा प्रदर्शित झालेला ट्रेलर अन् टिझर येथील सिनेरसिकांसमोर ठेवण्याबरोबरच प्रसारमाध्यमांचा संवाद साधण्यासाठी ते येथे आले होते. त्यांच्यासमवेत सिने अभिनेते आकाश ठोसर,अभिनेत्री सायली पाटील, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि झी स्टुडिओज् चे मंगेश कुलकर्णी होते.त्यांनीही माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.प्रारंभी सर्वांचं प्राचार्य चंद्रकांत साठे,माऊली शिक्षण संस्था वडाळाचे चेअरमन जितेंद्र साठे,अश्विन पाटील आणि गिताश्री साठे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.
नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात,हे मराठी सिनेरसिकांनी अनुभवले आहे.’घर बंदूक बिरयानी’ च्या ट्रेलरमध्ये पोलीस आणि टोळीची चकमक दिसते,यात एका तरूणाचाही सहभाग दिसत आहे. हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून पुढं काय ची उत्कंठा,हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.चित्रपटात प्रेमकहाणीचा ताना-बाना खुलताना दिसत आहे.चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे.आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा सुमधुर आवाज लाभलेले ‘गुन गुन’ हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे.’आहा हेरो’ या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर,विवेक नाईक,संतोष बोटे,राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून गणेश आचार्य यांचे या गाण्याला नृत्य दिग्दर्शन लाभले आहे,तर ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे.चित्रपटातील गाण्यांना ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून,वैभव देशमुख यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत,असं असले तरी चित्रपटाचं कथानक चित्रपटगृहातच सिनेरसिकांसमोर येईल, हे खरं आहे.चित्रपटाबद्दल फारसे काही सांगणार नाही.खरंतर हा चित्रपट करण्यास मी आधी नकार दिला होता, मात्र माझ्या नकाराचे नकळतच होकारात रूपांतर झाले.
चित्रपटाची कथा चांगली आहे,त्यानुसार गाण्यांचेही लेखन अन् त्याला साजेसे असे संगीत आहे.या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल,असंही शेवटी नागराज मंजुळे यांनी म्हटले.या पत्रकार परिषदेत नागराज मंजुळे,सयाजी शिंदे,आकाश ठोसर व अभिनेत्री सायली पाटील उपस्थित होते.
‘घर बंदूक बिरयानी’ ची गाणी नक्कीच पसंतीस उतरतील : मंगेश कुलकर्णी
‘’बिर्याणीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते,जी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवतात. तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत, जी संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात. तशीच ‘घर बंदूक बिरयानी’तीलही आहेत.’’असे झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.