राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधक आक्रमक; आमदारांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून नोंदवला निषेध

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून आंदोलन केले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी तोंडावर काळया पट्टया बांधून मूक आंदोलन केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले होते. आता आज पुन्हा एकदा विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन केले.
जर खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर २४ तासांच्या आता लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.