एक लाख रुपये स्वीकारताना परांडा तालुक्यातील सरपंच महिलेचा पती गजाआड ; जलजीवन मिशनचे काम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव – निवडणुकीत आपण लाखो रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे आता आपण वसुली करणार, काम सुरू ठेवायचे असेल तर गुपचूप पैसे द्या, अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकी देत सरपंच महिलेच्या पतीने लाचेची मागणी केली. परंडा तालुक्यातील रोहकल गावच्या महिला सरपंच यांच्या पतीला एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातून ताब्यात घेतले.

ग्रामपंचायतमधील काम सुरू ठेवण्यासाठी एका खाजगी ठेकेदार कंपनीला दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंच महिलेच्या पतीला सकाळी अटक करण्यात आली. दीड लाख रुपयांची मागणी करून एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. हनुमंत पांडुरंग कोलते असे लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. परंडा तालुक्यातील रोहकल ग्रामपंचायत मधील ठेकेदारीची कामे सुरू ठेवण्यासाठी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.

सकाळी रोकड स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाखो रुपये खर्चून आपण या निवडणुकीत निवडून आलो आहोत. त्यामुळे आता आपण वसुली करणार, तुम्ही गुपचूप पैसे द्या अन्यथा परिणाम वाईट होतील, काम करू देणार नाही, अशी धमकी देत लाचेची मागणी केल्याची धक्कादायक बाब रेकॉर्ड केलेल्या संभाषणातून समोर आल्याचे लाचलुचपत विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामात अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून ठेकेदार कंपनीची पैशासाठी अडवणूक केली जात होती.

एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये पर्यवेक्षक असलेल्या मेनकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी कंपनीचे सुरू असलेले काम बंद पाडले होते. पुन्हा काम सुरू करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर एक लाख रुपयात व्यवहार मिटला. पंचांसमक्ष १ लाख रुपये लाच रोख स्वरुपात स्वीकारताना धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात आरोपी कोलते यास ताब्यात घेण्यात आले. धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या