आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दि.7 ते 30 मार्च दरम्यान मोफत तपासणी शिबीर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अंॅजिओग्राफी 3 हजार, सिटी स्कॅन 1250 रुपयांत, एमआरआय 2500 रुपयात व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

अहमदनगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 31 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.7 मार्च ते दि. 30 मार्च 2023 या कालावधीत विविध मोफत आरेोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण व प्रबुध्द विचारक प.पू.आदर्शऋषीजी म.सा.यांच्या प्रेरणेतून हे शिबिर घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच.मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 260 बेडस्‌‍चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे. हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणी 2500 रुपये, सर्व प्रकारचे सिटी स्कॅन 1250 रुपये, सीटी अँजिओग्राफी 2500 रुपये, सोनोग्राफी कलर प्रिंट व रिपोर्टसह 600 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 250 रुपयात केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड बँक, 34 डायलेसिस मशिन कक्ष, परिपूर्ण फिजिओथेरपी विभाग आहे. या भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मंगळवार दि.7 मार्च रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबीर होईल. यात डोकेदुखी, अपस्मार, पॅरालिसिस, कंबरदुखी, नसांचे विकार, स्नायूंचे विकार, मेंदूतील जंतुसंसर्ग, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांची तपासणी व उपचार केले जातील. मणक्यातील चकती सरकणे, झटके येणे इत्यादीवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. ईईजी, ईएमजी तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.गौतम काळे, न्यूरोसर्जन डॉ.शैलेंद्र मरकड रूग्ण तपासणी करतील.
बुधवार दि.8 मार्च रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, सिझेरियन प्रत्येकी 10 हजार रुपयात केले जाईल. गर्भवती मातांची सोनोग्राफी, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या शिबिरापासून पुढील महिनाभराच्या कालावधीत 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपणावेळी होणाऱ्या फीमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण तपासणी करतील.
गुरुवार दि.9 मार्च रोजी मधुमेह, थायरॉइड, ग्रंथीविकार संबधित आजार तपासणी शिबीर होईल. यात कमी, जास्त रक्तदाब, जाडपणा, लवकर वयात येणे, वयात उशिरा येणे, मुलांमधील कमी उंची, पाळीतील अनियमितता, हाडांचा ठिसूळपणा, हाडे सतत फ्रॅक्चर होणे, चेहऱ्यावरील अनावश्यक केस, लैंगिक समस्या, चरबी संबंधित आजार, हार्मोन्स संबंधित आजार, रजोनिवृत्तीच्या समस्या, लहान मुलांमधील मधुमेह, थायरॉइड आजार, वयोवृध्दामधील हार्मोन्स समस्या, रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या, पुरुष वंध्यत्त्व आदी समस्यांवर उपचार होतील. शिबिरात एंडोक्रायनोजीस्ट डॉ.पियुष लोढा, फिजिशियन डॉ. गजेंद्र गिरी, डॉ.पियुष मराठे, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार उपचार मार्गदर्शन करतील.

शुक्रवार दि.10 मार्च रोजी जनरल सर्जरी शिबीर घेण्यात येईल. यात सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया करण्यात येतील. ॲपेंडिक्स शस्त्रक्रिया 7 हजार रुपये, इंगवायनल हर्निया 7 हजार रुपये तर हायड्रोसील शस्त्रक्रिया 4 हजार रुपयांत केली जाईल. जनरल सर्जन डॉ.प्रविण मुनोत, डॉ.भास्कर जाधव, डॉ.विवेक भापकर शिबिरात उपचार करतील. शनिवार दि.11 मार्च रोजी त्वचा रोग तपासणी शिबीर होणार आहे. मुरुम, पांढरे डाग, इसब, गजकर्ण, नायटा, केसांच्या, नखांच्या समस्या, सोरियासीस, चामखीळ, कुष्ठरोगावरील तपासणी व उपचार करण्यात येतील. त्वचारोग तज्ज्ञ डॉ.भास्कर पालवे रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करतील.
रविवार दि.12 मार्च रोजी हृदयरोग तपासणी शिबीर होणार आहे. यात ॲन्जिओग्राफी तपासणी 3 हजार रुपयांत केली जाणार आहे. तपासणीनंतर ॲन्जिओप्लास्टी, बायपास करण्याची गरज पडली तर ॲन्जिओग्राफीचे 3 हजार रुपये परत केले जातील. हृदय शस्त्रक्रिया हृदयातील झडप बदलणे, छिद्रे बुजवणे, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया व अँजिओप्लास्टी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत.
शिबिरात कार्डियाक सर्जन डॉ.स्वप्नील कर्णे, डॉ.श्रीरंग रानडे, डॉ.वसंत कटारिया, कार्डिओलॉजीस्ट डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.अमित थोपटे, कार्डियाक अनेस्थेटिस्ट डॉ.राहुल एरंडे, डॉ.विनय छल्लाणी, डॉ.प्रवीण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.पियुष मराठे, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार रूग्ण तपासणी करतील. मंगळवार दि.14 मार्च रोजी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. यात इंपोर्टेड इम्प्लांटसह संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण, संपूर्ण खुबा प्रत्यारोपण इंपोर्टेड इम्प्लांटसह 65 हजार रुपयांपुढे केले जाणार आहे. औषध खर्च वेगळा असणार आहे. यासह ए.सी.एल., रि कन्स्ट्रक्शन व ऑर्थोस्कोपी निदान केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनोंतर्गत पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.विशाल शिंदे, डॉ.अमित सुराणा तपासणी करणार आहेत.
बुधवार दि.15 मार्च रोजी किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. यात अंगावर सूज येणे, लघवी कमी अथवा लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस मोफत केले जाईल. यात नेफ्रोलॉजीस्ट डॉ.गोविंद कासट, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार रूग्ण तपासणी करतील.
शनिवार दि.18 मार्च रोजी दंतरोग तपासणी व उपचार शिबीर होणार आहे. यात दातांच्या नसावरील उपचार मेटल कॅप एक हजार रुपये, सिरॅमिक कॅप 1500 रुपये, रुट कॅनल 1800 रुपये, दातांची कवळी बसवणे 7 ते 14 हजार दरम्यान, दात साफ करणे, दातात सिमेंट भरणे प्रत्येकी 400 रुपये, दात काढणे आदी उपचार केले जाणार आहेत. दंतरोग तज्ज्ञ डॉ.अपर्णा पवार, डॉ.संजय असनानी, डॉ.कोमल ठाणगे, डॉ.प्राची गांधी, लहान मुलांचे दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्रणव डुंगरवाल या शिबीरात उपचार करतील.

रविवार दि.19 मार्च रोजी मोफत नेत्र रीग तपासणी शिबीर होणार आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे होणाऱ्या या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, रेटिना तपासणी व शस्त्रक्रिया, तिरळेपणा, लहान मुलांचे मोतीबिंदू तपासणी होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत येणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी संपर्क- 8686401515. नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.अशोक महाडिक, डॉ.संदीप राणे, डॉ.विशाल तांबे, डॉ.कौस्तुभ घोडके, डॉ.नेहा भराडिया, डॉ.किरण शिंदे, डॉ. आदित्य नाकाडे, डॉ.कृतिका रेवणवार, डॉ.विजय दगडे, डॉ.पियुष सोमाणी, डॉ.सचिन कसबे, डॉ.थोपटे रूग्ण तपासणी व उपचार करतील. सोमवार दि.20 मार्च रोजी एंडो युरोलॉजीकल मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय, मूत्रमार्ग स्टोन शस्त्रक्रिया शिबीर होईल. प्रोस्टेट रोग उपचार, पुरुष वंधत्य समुपदेशन, मूल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्र मूल्यमापन, मूत्रमार्गातील विकार, अंडाशय कर्करोग व्यवस्थापन आदींवर उपचार मार्गदर्शन केले जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. शिबिरात मूत्रविकार शल्यचिकित्स डॉ.संकेत काळपांडे उपचार करतील.
मंगळवार दि.21 मार्च रोजी कान, नाक, घसा व स्पीच थेरपी तपासणी शिबीर होणार आहे. या शिबिरात डॉ.सुकेशिनी गाडेकर, वाचा व भाषा उपचार तज्ज्ञ डॉ.अझहर शेख रूग्ण तपासणी करणार आहेत. गुरुवार दि.23 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबीर सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी, स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी मशिनव्दारे करण्यात येईल. स्त्रियांच्या गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या तपासणीसाठी सवलतीच्या दरात पॅपस्मीयर तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी तपासणी फक्त 100 रुपयात करण्यात येणार आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी उपचार मोफत उपलब्ध आहेत. या शिबिरात कॅन्सर
सर्जन डॉ.विनायक शेंडगेे, कॅन्सर विकार तज्ज्ञ डॉ.लिझा बलसारा, फिजिशियन डॉ.पियुष मराठे, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार, सर्जन डॉ.विवेक भापकर, डॉ.प्रवीण मुनोत, डॉ.भास्कर जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे, रेडिओलॉजीस्ट डॉ. मितेश कटारिया, डॉ.भक्ती फलके, डॉ.सोनाली सोलट, डॉ.निखिता जैन (कटारिया), पॅथॉलॉजी डॉ.मुकुंद उंडे, डॉ.सारिका झरेकर, मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ.नरेंद्र पाटील रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार दि.24 मार्च रोजी बालरोग तपासणी शिबीर होणार आहे. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया हर्निया, डायाफ्रामॅटिक हर्निया, हायड्रोसेल, फिमोसिस, अंडिसेंड टेस्टीस व इतर शस्त्रक्रिया करण्यात येतील. यात बालरोग तज्ज्ञ डॉ.वैभवी वंजारे, डॉ.सोनाली कणसे, पिडियाट्रीक सर्जन डॉ.रूपेश सिकची रूग्ण तपासणी करतील. रविवार दि.26 मार्च रोजी पोटाचे आजार, सर्व प्रकारचे यकृताचे विकार व स्वादूपिंडाचे आजार तपासणी शिबीर होईल. यात गॅस्ट्रोस्कोपी 1500 रुपयात तर कोलोनोस्कोपी 3 हजार रुपयांत केली जाणार आहे. नगरमध्ये प्रथमच हायड्रोजन ब्रेथ टेस्ट व हाय रिझोल्युशन मॅनोमेट्रीची सोय सवलतीच्या दरात उपलब्ध. शिबिरात पोटाचे विकार तज्ज्ञ डॉ.राजेंद्र गुंजाळ उपचार करतील. सोमवार दि.27 मार्च रोजी प्लॅस्टिक सर्जरी शिबीर होणार आहे. यात लहान मुलांच्या हाताच्या जन्मजात समस्या, व्यंग, मधुमेहामुळे होणाऱ्या जुनाट जखमा, पायाच्या जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहऱ्यावरील व्रण आदी समस्यांवर उपचार करण्यात येतील. प्लॅस्टिक सर्जन डा.माया मरकड शिबिरात तपासणी व उपचार करणार आहेत. बुधवार दि.29 मार्च रोजी मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर होणार आहे. यात फिजिशियन डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रविण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.पियुष मराठे, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार तपासणी करतील.
गुरुवार दि. 30 मार्च रोजी दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबीर होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे पोटातील, बेंबी, जांघेतील हर्नियाची शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 12 हजार रुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 10 हजार रुपये, स्टॅपलर लेझर पाईल्स शस्त्रक्रिया 15 हजार रुपये, अपेंडिक्स शस्त्रक्रिया 4 हजार रुपये, स्त्रीयांचे वंध्यत्व तपासणीसाठी ट्युबल पेटेन्सी टेस्ट 2 हजार रुपये, स्त्रीयांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया 3 हजार रुपयांत केली जाईल. या शस्त्रक्रियांसाठी औषधे, जाळीचा व आयसीयुचा खर्च वेगळा असेल. या शिबिरात लॅप्रोस्क्रोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण तपासणी करतील. या शिबिराची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 0241-2320473/74/75 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9404399911 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे. रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांकरिता हॉस्पिटल शेजारील महावीर भवन येथे फक्त 35 रुपयांत भोजनाची व्यवस्था कार्यरत आहे. तसेच 24 तास आनंदऋषीजी ब्लड बँक कार्यरत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या